नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठे यश आले आहे. लष्कराने दहशतवाद्यांवर जोरदार हल्ला चढवला असून गेल्या 12 तासांपासून इथे चकमक सुरु आहे. १२ तासापासून झालेल्या दोन चकमकीत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे पाच दहशतवादी ठार झाल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी याविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार, गेल्या 12 तासांत पुलवामामध्ये चार दहशतवादी मारले गेले तर, बडगाममध्ये एक दहशतवादी मारला गेला. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश कमांडर दहशतवादी जाहिद वानी आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे.
दक्षिण काश्मीरच्या पुलवामाच्या नायरा भागात आणि मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील चरार-ए-शरीफ भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच कारवाई करत, सुरक्षा दलांनी परिसर घेरण्यास सुरुवात केली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा कर्मचारी शोध घेत असताना लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आणि चकमक सुरू झाली.
काल दहशतवाद्यांनी अनंतनागमध्ये एका पोलिसाची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद गनी यांची अनंतनागमधील बिजबेहारा येथील तबला भागातील हसनपोरा येथील त्यांच्या घराजवळ दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. घनी यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला, असे त्यांनी सांगितले.