चाळीसगावात शेतातील शेडमधून ८२ हजारांच्या १० शेळ्या-बकऱ्या चोरीला

वाघडू-पातोंडा रस्त्यावरील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव, प्रतिनिधी : चाळीसगाव तालुक्यातील वाघडू ते पातोंडा रस्त्यावरील शेतातील तार कंपाउंड केलेल्या शेडमधून ८२ हजार रुपये किमतीच्या १० शेळ्या-बकऱ्या चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघडू येथील शेतकरी नाना आधार पाटील (वय ५८) यांच्या शेतातील गट क्रमांक १११/२ मधील शेडमध्ये शेळ्या-बकऱ्या बांधलेल्या होत्या. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेपासून ते १ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने शेडमधून एकूण १० जनावरे चोरून नेली. यामध्ये चार बकऱ्या, तीन बोकड आणि तीन पाटांचा समावेश असून, चोरी गेलेल्या जनावरांची एकूण किंमत ८२ हजार रुपये आहे.
याप्रकरणी १ नोव्हेंबर रोजी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हेडकॉन्स्टेबल रमेश पंढरीनाथ पाटील पुढील तपास करीत आहेत








