वरणगावजवळ तरुणावर गोळीबार; लोखंडी रॉडनेही हल्ला

फुलगाव उड्डाणपुलाखालील घटना; मुक्ताईनगरचा २५ वर्षीय तरुण गंभीर जखमी
वरणगाव, प्रतिनिधी : वरणगावजवळील फुलगाव उड्डाणपुलाखालील बायपास रस्त्यावर रविवारी (१ नोव्हेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करून लोखंडी रॉडने डोक्यावर वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात मुक्ताईनगर येथील सरफराज सय्यद बशीर सय्यद (वय २५) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या खांद्याला गोळी लागली असून डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. हल्ल्यानंतर दुचाकीवरून आलेले तीन अज्ञात हल्लेखोर पसार झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आधी लोखंडी रॉडने वार, नंतर गोळीबार
हल्लेखोरांनी सरफराज याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले. त्यानंतर गावठी कट्ट्यातून त्याच्या दिशेने दोन ते तीन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी सरफराजच्या खांद्याला लागली. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने तो रस्त्यावर कोसळला. हल्ल्यानंतर तिन्ही संशयित दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले.
अनोळखी क्रमांकावरून फोन; बायपासवर अडविले
प्राथमिक माहितीनुसार, सरफराज हा भुसावळ येथील वाहनचालक म्हणून काम करतो. रविवारी काम आटोपल्यानंतर तो दुचाकीने मुक्ताईनगर येथील घरी जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान, त्याला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यानंतर तो नेहमीच्या मार्गाने उड्डाणपुलावरून न जाता पुलाखालील बायपास रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याला अडविले. त्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
जखमीला जळगावला हलविले
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी सरफराज याला तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
हल्ल्यामागील कारण अस्पष्ट; संशयितांचा शोध सुरू
बायपास रस्त्यावर भरसायंकाळी गोळीबाराची घटना घडल्याने वरणगावसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरफराज याच्यावर हल्ला करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पसार झालेल्या तिन्ही संशयितांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून शोध सुरू आहे. पुढील तपासानंतर हल्ल्यामागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.









