मातोश्री नगरातील चामुंडा माता मंदिरात चोरी; दागिने अन् रोकड लंपास


अमळनेर पोलिसांत तक्रार अर्ज; परिसरात पोलीस गस्त वाढवण्याची नागरिकांची मागणी
अमळनेर: तालुक्यातील मातोश्री नगर परिसरातील श्री चामुंडा माता मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून दानपेटीतील रोकड आणि सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना २८ ऑगस्टच्या रात्री घडली. चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त केले व दानपेटी फोडली.
सकाळी मंदिर उघडल्यानंतर हा चोरीचा प्रकार निदर्शनास आला. चोरट्यांनी दानपेटीतील ३० ते ३५ हजार रुपयांची रोकड तसेच देवीचे दोन सोन्याचे हार, सोन्याच्या टिकल्या आणि पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या असा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी पत्रकार हितेंद्र जगन्नाथ बडगुजर यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देऊन कारवाईची मागणी केली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांत या भागात चोरीची ही दुसरी घटना घडल्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या पोलीस गस्तीत वाढ करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.









