जळगावातील घटना ; पोलीसात गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर तरुणीने थेट लग्नाचा तगादाच लावला. मग तरुणाने कुटुंबीयांशी चर्चा करून विवाह केला. मात्र विवाहानंतर तरुणी मात्र आक्षेपार्ह व्यवहार करू लागली. तसेच पत्नी धर्म निभावण्यास नकार देऊ लागली. त्यानंतर मात्र एका डॉक्टरांकडे जाण्याचे वेळी शंका आल्याने तरुणीचे बिंग फुटले आणि ती तरुणी नसून तृतीयपंथी असल्याचे चौकशीअंती दिसून आले. तसेच तृतीय पंथी याच्या सहकाऱ्यांनी दहा लाख रुपये मागितल्यामुळे तरुणाने याबाबत फसवणूक झालेल्या तरुणाने थेट न्यायालयात खटला दाखल केला आहे. तसेच बुधवारी ५ जुलै रोजी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन (वय २६, काल्पनिक नाव) हा त्याचे नातेवाईकांकडे गिरणा पंपिंग रोडवरील एका कॉलनीत राहत. त्याने याबाबत फिर्याद दिली आहे. त्याच्या घरात आई, लहान भाऊ असून खाजगी नोकरी करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. वडिलांचे पूर्वीच निधन झाले आहे. त्याला फेसबुक अकाउंटवर 14 एप्रिल रोजी दिव्या पाटील नावाच्या तरुणीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. चेतनने ती स्वीकारली. त्यानंतर त्यांचे बोलणे सुरू झाले. एकमेकांच्या परिवाराविषयी त्यांनी माहिती घेतली. तरुणीने, माझे आई-वडील वारले असून मी खोटे नगरला एकटीच राहते. मी शेअर मार्केटच्या व्यवसायातून पैसे कमावते. तसेच जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे लॅबला कामाला आहे असे सांगितले.
नंतर तरुणीने लग्न करण्याविषयी तगादा लावला. त्यानंतर चेतनच्या नातेवाईकांनी दोघांना बोलावून घेतले. तिथे गेल्यानंतर दिव्या पाटील हिने आत्ताच कुठल्यातरी मंदिरात जाऊन लग्न करू असा तगादा लावला. त्यानंतर, चेतनला तुझा वाढदिवस कधी आहे असे विचारले तेव्हा त्याने २९ एप्रिल सांगितले. तिने २९ एप्रिलला लग्न करायचे असल्याचे सांगितले. तर तिचे नातेवाईक कोणी येऊ शकेल का ? तर मामा-मामी आहेत. पण ते येऊ शकणार नाही असे दिव्या पाटील हिने सांगितले. जास्त लोकांना बोलावू नका. मोठा सोहळा करू नका असे तिने सांगितले. त्यानंतर २९ एप्रिल रोजी चेतन आणि दिव्या यांचा धार्मिक पद्धतीने गिरणा पंपिंग रोड मधील नगरातच विवाह संपन्न झाला.
विवाह नंतर २९ एप्रिल ते ८ मे च्या दरम्यान दिव्या पाटील हिने पत्नी धर्म निभावण्यात कसूर केला. तसेच पती चेतन व त्याच्या कुटुंबीयांशी गैरवर्तन करू लागली. नंतर तर शिवीगाळ करू लागली. त्यामुळे चेतन व कुटुंबीय त्रस्त झाले. दरम्यान, ८ मे रोजी तिला तब्येत बरी नसल्याने जवळच्या दवाखान्यात चेतनच्या आईने नेले. तेथे तिने डॉक्टरांना तपासणी करू देण्यास नकार दिला व टाळाटाळ करीत तिथून निघून गेली. त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितले की, दिव्याचे वर्तन स्त्रीप्रमाणे वाटत नाही. ती तृतीयपंथी असल्यासारखी वाटत आहे. तुम्ही तपासून घ्या. त्यानंतर घरी आल्यानंतर चेतनच्या आईने व मामीने दिव्या पाटील हीस् विचारणा केली.
त्यावेळी जोरजोरात आरडाओरड करून तिने कपडे काढून टाकले. त्या वेळेला दिव्या ही स्त्री नसून तृतीयपंथी असल्याचे दिसून आले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे चेतन व त्यांच्या कुटुंबीयांना कळाले. अधिक माहिती चेतनच्या कुटुंबीयांनी घेतली असता त्या तृतीयपंथीयाचे वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर वेगवेगळ्या नावाने खाते आहे. दिव्या पाटील हिचे खरे नाव रोहित मनिष मसिह असल्याचे कागदपत्रांवरून दिसून आले. यापूर्वी एमआयडीसी परिसरातील एका घरात एका पुरुषासोबत देखील राहत होती. तसेच भुसावळ येथील तृतीयपंथीयांच्या एका समूहाची सदस्य असल्याची देखील चेतनला माहिती मिळाली. तसेच दिव्या पाटील हिची जळगावच्या एका दवाखान्यात लिंग बदलाची शस्त्रक्रिया झाली असल्याचेही दिसून आले.
चेतनच्या कुटुंबीयांनी तिच्या मामा मामीला भेटण्यास गेले असता हे प्रकरण मिटवायला दहा लाख रुपये लागतील. आम्ही दिव्याला पुढे करून पैसे उकळण्याचा धंदा करतो असे त्यांनी सांगितले. त्यानुसार चेतन याने पोलीस अधीक्षक यांना पत्र लिहून फसवणूक झाल्याबद्दल व कार्यवाही करण्याबद्दल कळविले आहे. त्यानंतर न्यायालयात खटला देखील दाखल केला आहे. त्यानुसार रामानंदनगर पोलीस स्टेशनला बुधवार दिनांक ५ जुलै रोजी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील करीत आहेत