अमळनेर तालुक्यात दोन गायींची चोरी; शेतकऱ्याचे १० हजारांचे नुकसान


अमळनेर | प्रतिनिधी — अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा शिवारातून मध्यरात्री दोन गायी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. शेतातील गोठ्यात बांधलेल्या दोन्ही गायी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने शेतकऱ्याचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टाकरखेडा येथील शेतकरी सुनील रामलाल पाटील (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या शेतातील गट क्रमांक १९८ तसेच कुरहे येथील शिवारातील गट क्रमांक ११७/२/ब परिसरातून १४ ऑगस्ट रोजी रात्री २.१५ ते पहाटे ४ वाजेच्या दरम्यान दोन गायी चोरीला गेल्या.
चोरीस गेलेल्या गायींपैकी एक काळ्या रंगाची, चारही पाय व पोटाचा खालचा भाग पांढऱ्या रंगाचा, दोन लहान शिंगे असलेली सुमारे चार वर्षांची गाय असून तिची किंमत अंदाजे ४ हजार ५०० रुपये आहे. दुसरी गाय काळ्या रंगाची, दोन लहान शिंगे असलेली सुमारे पाच वर्षांची असून तिची अंदाजे किंमत ५ हजार ५०० रुपये आहे.
शेतात बांधलेल्या गायी अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या संमतीशिवाय व लबाडीच्या उद्देशाने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सकाळी गायी दिसून न आल्याने शोध घेतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.
या घटनेप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४३०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल पाठवून पुढील तपास पोहेकॉ. ५१० सुनील जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.









