
नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- कोरोना हा सामान्य आजार असून घाबरून जाण्याचे कारण नाही. देशातील 85 टक्के कोरोना रुग्णांना ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची गरज नाही, असा दावा एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी रविवारी केला. रेमडेसिवीर ही काही जादूची गोळी नाही, असेही ते म्हणाले. कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरील तज्ञ डॉक्टरांच्या चर्चासत्रात ते बोलत होते.
वेबिनारच्या माध्यमातून झालेल्या चर्चेत ‘मेदांता’चे चेअरमन डॉ. नरेश त्रेहान, ‘एम्स’च्या मेडिसिन विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. नवीत विग आणि आरोग्य सेवेचे महासंचालक डॉ. सुनील कुमार यांनीही सहभाग घेतला. यावेळी डॉ. गुलेरिया म्हणाले, देशातील कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीवर बोलायचे झाल्यास लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
भीतीमुळेच लोक आपल्या घरामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन सिलिंडर्स ठेवू लागलेत. त्यामुळे ज्या रुग्णांना ऑक्सिजनची नितांत गरज आहे त्यांना ऑक्सिजन मिळत नसल्याची वास्तव स्थिती आहे. यातूनच अनावश्यक भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा संसर्ग सामान्य संसर्ग आहे. 85 ते 90 टक्के रुग्णांमध्ये ताप, खोकला, अंगदुखी, सर्दी अशी किरकोळ लक्षणे आहेत. या रुग्णांना ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची गरज नाही. ही सामान्य लक्षणे असलेली लोक घरीच योगा वा घरगुती उपाय करून सात ते दहा दिवसांत बरे होऊ शकतात. अशा लोकांनी घरात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन ठेवण्याची गरज नाही, असे मत डॉ. गुलेरिया यांनी मांडले.
केवळ 10 ते 15 टक्के लोकांनाच रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज असते, तर 5 टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज लागते. रेमडेसिवीर ही काही जादूची गोळी नाही. जे रुग्ण रुग्णालयात उपचार घेताहेत, ज्यांची प्रकृती गंभीर आहे अशाच रुग्णांना रेमडेसिवीर द्यायला हवे. नाहीतर रेमडेसिवीरचा फायदा होण्याऐवजी नुकसान होईल, असा सावधगिरीचा सल्ला डॉ. गुलेरिया यांनी दिला आहे.







