जळगावातील एमआयडीसी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी परिसरातील एका विवाह स्थळावरून नववधूचे ४ लाख ६० हजारांचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. ही घटना रविवार दि. १४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश गुलाबराव जाधव (५२, रा.कोल्हे नगर, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मुलीच्या लग्नाचे आयोजन एमआयडीसीतील सुरभी लॉनमध्ये रविवार दि. १४ जुलै रोजी करण्यात आले. नववधूचे सर्व दागिने, रोकड आणि मोबाईल एका पिशवीत ठेवून सतीश जाधव यांच्या पत्नीकडे सांभाळण्यासाठी दिले होते. त्यांनी ते दागिने हॅण्डबॅगमध्ये ठेवलेले होते.(केसीएन)दरम्यान दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास लग्न समारंभ कार्यक्रम सुरू असताना सतीश जाधव यांच्या पत्नी या काही कामानिमित्त बाहेर गेल्याने त्यांच्या हातातील दागिन्यांची हॅन्डबॅग हॉलच्या एका कोपर्यात ठेवली होती.
मात्र त्या काम आटोपून बॅगेकडे आल्या असता त्यांना दागिन्यांची बॅग दिसून आली नाही. लग्न समारंभात संपूर्ण शोधाशोध करत नातेवाईकांनी विचारपूस करण्यात आली. परंतु दागिन्यांबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर सतीश जाधव यांनी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे हे करीत आहे. दरम्यान, विवाहस्थळी चोरी होण्याची हि जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. यापूर्वी चाळीसगाव येथेहि हॉलमधून चोरी झाली होती.