धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावातील घटना, नातेवाईकांकडून रास्ता रोको
धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंप्री गावाजवळील चैताली जिनिंग फॅक्टरीजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला होता तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी १४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमास घडली होती. दरम्यान मयताच्या नातेवाईकांनी धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयासमोर रास्ता रोको करतन्यायासाठी आंदोलन केले. यावेळी धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे यांनी नातेवाईकांना समजूत काढत कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे राहणारे रॉबिन संजय सोनवणे आणि रोहित संजय सोनवणे हे दोघे भाऊ रविवारी दि. १४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता दुचाकी (एमएच १९ डीई ६६४९) ने एरंडोलकडून बायपासमार्गे चैताली जिनिंगकडून पिंप्री येथे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान पिंपरी गावाजवळील समोरून भरधाव वेगाने येणारी कार क्रमांक (एमएच ३९ एएच ९९९०) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रॉबिन सोनवणे याचा जागेवरच मृत्यू झाला होता. तर त्याचा भाऊ रोहित सोनवणे हा गंभीर जखमी झाला. दोघांना धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. यात रॉबीनला तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत रात्री ८ वाजता कारवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, सोमवारी दि. १५ जुलै रोजी दुपारी १२ वाजता मयत रॉबिन सोनवणे यांच्या नातेवाईकांनी थेट धरणगाव ग्रामीण रुग्णालयासमोरील महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान पोलीस निरीक्षक उध्दव ढमाले यांनी मयताच्या नातेवाईकांची समजूत घालत कायदेशीर कारवाई करण्यात येईल व आपल्याला मदत देण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.