भुसावळ बसस्थानक येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात चोरटयांनी आता बस प्रवास करणाऱ्या महिलांच्या पर्स लुटण्याकडे लक्ष्य पुन्हा केंद्रित केल्याचे दिसून आले आहे. भुसावळ बसस्थानक येथून खामगाव येथे प्रवास करत असतांना दोन महिलांच्या पर्समधून १ लाख ९२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवारी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुनम नितीन कुमार दुबे (वय-३२, रा. मधुनगर आग्रा, उत्तरप्रदेश) या महिला त्यांचे सहकारी सोनी आशिष मिश्रा यांच्यासोबत रविवारी ५ नोव्हेंबर रोजी भुसावळ बसस्थानक येथे आलेल्या होत्या. त्यानंतर दुपारी १ वाजता त्यांना खामगाव येथे जाण्याचे असल्याने भुसावळहून खामगाव असा प्रवास करत असतांना अज्ञात चोरटयांनी त्यांच्याजवळ असलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण १ लाख ९२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. प्रकार घडल्यानंतर सदर महिलेने दुसऱ्या दिवशी सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेश चौधरी करीत आहे.