
चोपडा ( प्रतिनिधी ) – अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात चोपडा शहर पोलिसांनी प्रभावी कारवाई करत चोपडा-शिरपूर मार्गावरील बंद पडलेल्या टोलनाक्याजवळ २.१२० किलो गांजा बाळगणाऱ्या एका संशयिताला अटक केली. या कारवाईत गांजा, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण १ लाख १ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास चोपडा-शिरपूर रोडवरील बंद पडलेल्या टोलनाक्याजवळ संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तीची तपासणी करण्यात आली. यावेळी विजय मुसा पावरा (वय ३५, रा. महादेव दांडवाडे, ता. शिरपूर, जि. धुळे) याच्या ताब्यातून २.१२० किलो गांजा आढळून आला.
या कारवाईदरम्यान आरोपीकडून २.१२० किलो गांजा (किंमत २१ हजार २०० रुपये), टीव्हीएस कंपनीची दुचाकी (किंमत ७० हजार रुपये) तसेच ओप्पो कंपनीचा मोबाईल (किंमत १० हजार रुपये) असा एकूण १ लाख १ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(सी), २०(ब)(ii)(B) आणि २२(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
अमली पदार्थांच्या तस्करी आणि विक्रीविरोधात चोपडा शहर पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे अशा अवैध कृत्यांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.










