वडती, ता.चोपडा (प्रतिनिधी) – राष्ट्रपिता म. गांधी जयंतीचे निमित्त साधून घनकचरा व्यवस्थापन विषयक नविन कामांचा चोपडा नगर परिषदेकडून शुभारंभ झाला आहे. अशोका एंटरप्रायजेस, मुंबई हे सदर कामाचे अभिकर्ता आहेत. सदर कामात दुकाने, वाणिज्य भागाचा कचरा संकलन व वाहतुक, शहरातील रस्ते सफाई, गटर सफाई, सार्वजनिक शौचालय सफाई, कंपोस्ट डेपो चालविणे इ. कामांचा समावेश आहे. या सर्व कामांसाठी सुक्ष्म नियोजन केले असुन सदरचे काम सर्वसमावेशक आहे.
कचरा संकलन कामी कंत्राटदाराच्या ६ नवीन घंटागाडी वाढल्या असुन प्रभागनिहाय एक घंटागाडीचे नियोजन केले आहे. त्यांचा प्रवास मार्ग व थांबे, वेळ निश्चित करणेत आलेले आहे. तसेच घंटागाडीला जी.पी.एस सिस्टीम असुन दैनंदिन त्यांचे प्रवासमार्गावर पर्यवेक्षण केले जाणार आहे.
तसेच रस्ते सफाई, गटर सफाई व सार्वजनिक शौचालय सफाई कामी शहराचे स्वच्छता विभागाने ५ झोन मध्ये विभागणी केलेली असुन झोननिहाय रस्त्यांचे क्षेत्रफळ व गटारींची लांबी रनिंग मीटर विहीत केलेली आहे. तसेच रस्ते सफाई झोन क्र. १ ते ४ अभिकर्ता व झोन क्र. ५ ची रस्ते सफाई न.प. कर्मचारी यांचेकडून केली जाईल. तसेच गटर सफाई – झोन क्र. २,३,४ अभिकर्ता व झोन क्र. १ व ५ न.प. कर्मचारींकडून करणेत येईल.
नागरिकांनी कचरा उघड्यावर न टाकता घंटागाडीतच टाकावा. तसेच ओला, सुका व घरगुती घातक कचरा वर्गीकरण करुन देणे बंधनकारक आहे. वर्गीकृत कचरा न दिल्यास दंडात्मक कारवाई करणेत येईल तसेच कचरा गटारीत तसेच रस्त्यावर इतरत्र टाकू नये व नगरपरिषदेस सहकार्य करावे. चोपडा शहर स्वच्छ ठेवणेकामी आपले योगदान द्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी केले आहे.
सदर शुभारंभ प्रसंगी चोपडा नगरपरिषद मुख्याधिकारी अविनाश गांगाडे, उपनगराध्यक्ष भुपेंद्र गुजराथी, गटनेते चोपडा विकास मंच जीवन चौधरी, उपमुख्याधिकारी निलेश ठाकूर, स्वच्छता निरिक्षक व्ही. के. पाटील, स्वच्छता पर्यवेक्षक प्रविण मराठे आदी न.प. कर्मचारी उपस्थित होते.







