जळगावच्या सिंधी कॉलनी परिसरातील घटना, पैशाच्या मागणीतून झाली घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात पुन्हा एकदा खुनी हल्ला झाल्याची घटना शुक्रवार दि. २ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता घडली आहे. उसनवारी दिलेले पैसे परत मागण्याच्या कारणावरून तरुणाला चौघांनी शिवीगाळ करून दमदाटी केली. त्यातील एका संशयित आरोपीने तरुणाच्या छातीवर,पोटावर धारदार शस्त्राने गंभीर वार केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अविनाश किशोर जोशी (वय २५, रा. संजय गांधी नगर, जळगाव) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. तो संजय गांधी नगर येथे त्याच्या परिवारासह राहतो. शुक्रवारी दि. २ ऑगस्ट रोजी अविनाशने सिंधी कॉलनी परिसरातील घराजवळ संशयित आरोपी भुरा जोशी हा उभा असताना त्याला मागील उसनवारी दिलेले वीस हजार रुपये मागितले.(केसीएन) त्यावेळेला भूरा जोशी हा विनाकारण मोठमोठ्याने शिवीगाळ करू लागला. त्यामुळे भुरा जोशी याचा भाऊ सचिन जोशी, सचिन जोशीचा मोठा मुलगा हर्षल सचिन जोशी आणि पुष्पा मधुकर जोशी हे तेथे आले. त्यांनीही अविनाश जोशीला शिवीगाळ आणि दमदाटी केली.
त्यावेळी हर्षल जोशी याने त्याच्या हातातील धारदार शस्त्राने अविनाश जोशी यांच्या पोटावर छातीवर वार करून गंभीर दुखापत केली. तयानंतर घटनास्थळावरून सर्व संशयित आरोपी पसार झाले.(केसीएन) दरम्यान, कॉलनीतील मंगल जोशी, चुलत भाऊ राहुल जोशी, जयेश जोशी यांनी अविनाशला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी घटनास्थळावरून फरार झालेल्या संशयित आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. जळगावात पुन्हा प्राणघातक हल्ला झाल्यामुळे जळगाव शहर पुन्हा चर्चेत आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अविनाश जोशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भुरा जोशी या संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत.