चिंचखेडा शिवारात शेतीपंपांच्या तांब्याच्या वायरींची चोरी; २१ हजारांचे नुकसान, जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल


नेरी/जामनेर (जि. जळगाव):
तालुक्यातील चिंचखेडा शिवारात अज्ञात चोरट्यांनी उधमाळ करत विविध शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या मोटारींच्या तांब्याच्या वायरी कापून नेल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत सुमारे १२९० फूट तांब्याची वायर लांबवण्यात आली असून, शेतकऱ्यांचे २१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचखेडा शिवारातील गट क्रमांक ६३ व त्यास लागून असलेल्या परिसर व धरणावरील शेतीपंपांवर चोरट्यांनी लक्ष केंद्रित केले. दिनांक २ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अज्ञात चोरट्यांनी परिसरातील शेतीपंपाच्या मोटारींच्या वायरी कापून एकूण १२९० फूट लांबीची तांब्याची वायर (किंमत रु. २१,०००/-) चोरून नेली.
या प्रकरणी नेरी बुद्रुक येथील बाधित शेतकरी शिवाजी दौलत पवार (वय ६५) यांनी पोलीस दूरक्षेत्रात तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून ६ ऑगस्ट रोजी रात्री १०:५० वाजता जामनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील शिंदे व पोलीस हवालदार गणेश भावसार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पो.ह. गणेश भावसार करत आहेत.









