जळगाव (प्रतिनिधी) – तीन वर्षाची चिमुकलीचा शेतातील झोपडीच्या अंगणात खेळत असतांना विद्यूत खंब्याला धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना जळगाव तालुक्यातील नशिराबाद शिवारात रविवारी १६ जुलै रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने सोबत असलेल्या मोठ्या बहिणी या बचावल्या आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बावरी रूमला पावरा (वय-३) रा. नशिराबाद ता.जि.जळगाव असे मयत बालिकेचे नाव आहे.
नशिराबाद गावातील चंदन सोपान पाटील यांच्या शेतात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून रूमला पावरा हा तरूण आई,वडील, पत्नी आणि तीन मुलीसोबत झोपडी करून राहत आहे. त्यांच्या घराच्या बाजूतून विद्यूत तारा गेलेल्या असून झोपडीच्या नजीक रूमला पावरा आणि त्याचे आईवडील यांची असे एकुण दोन झोपड्या आहेत. ईश्वर पावरा हा कामाच्या निमित्ताने बाहेरगाव गेलेला होता. रविवारी १६ जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रूमला पावरा यांची सर्वांत लहान मुलगी बावरी ही आपल्या दोन मोठ्या बहिणीसोबत झोपडीजवळ खेळत होत्या. त्यावेळी लोखंडी खंब्यात विजेचा प्रवाह उतरलेला होता. त्यावेळी बावरी ही खेळत असतांना तिचा विजेच्या खांबाला धक्का लागला. त्यावेळी तिला विजेचा धक्का लागल्याने जागीच दुदैवी मृत्यू झाला. तिच्या नातेवाईकांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फोजदार रवींद्र तायडे करीत आहे.