जळगाव (प्रतिनिधी ) – जिल्ह्यात सध्या साप चावल्याच्या घटना अलीकडे वाढल्या असून यामुळे अनेकांचा जीव गेल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. तालुक्यातील शिरसोली येथील दापोरा रोडवर असणाऱ्या टॉवर जवळ राहणाऱ्या एका साडेचार वर्षाच्या चिमुकलीला भर झोपेत असताना एका विषारी सर्पाने चावा घेतल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास येथे घडली . या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिरसोली येथील रहिवाशी गणेश मराठे रा. दापोरा रोड हे आपल्या दोन मुली आणि पत्नीसह राहतात. मंगळवार २७ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास गणेश मराठे आणि त्यांची साडेचार वर्षांची लहान मुलगी लावण्या ह्या कॉटवर झोपलेल्या असताना अचानक रात्री १२ वाजेच्या सुमारास एका सर्पाने घरात प्रवेश करून लावण्याच्या हाताला चावा घेतला . तिच्या ओरडण्याने घरातील सर्वांना जाग आल्याने लावण्या हिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गणेश मराठे यांच्या पश्चात पत्नी , दीड वर्षांची मुलगी असा परिवार असून ते एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.