चाळीसगाव तालुक्यात हातले येथे समाधान शिबिरात ९७९ लाभार्थ्यांना योजनेचा लाभ
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) :- चाळीसगाव मतदारसंघाचे आ. मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत हातले येथील सामाजिक सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे शुक्रवारी सकाळी उद्घाटन झाले. या शिबिरात विविध प्रशासकीय विभागांमार्फत एकूण ९७९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देण्यात आला.
आमदार चव्हाण यांनी या शिबिराचे कौतुक करत, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू केलेली ही शिबिरे म्हणजे शासन आणि प्रशासन नागरिकांच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा आणि प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याचा उत्तम प्रयत्न आहे,” असे प्रतिपादन केले. त्यांनी सर्व नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना मनापासून काम करून शासनाचा उद्देश सफल करण्याचे निर्देश दिले.
यावेळी प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य पोपट भोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिबिरात आरोग्य विभागाने मोफत आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित केले होते.
शिबिरातील प्रमुख लाभांचे विवरण
* कृषी विभाग: राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ₹१ लाखांच्या अनुदानावर ३ ट्रॅक्टरचे वाटप.
* संजय गांधी योजना: १०२ लाभार्थ्यांची DBT प्रक्रिया पूर्ण.
* आरोग्य तपासणी: २५८ लाभार्थ्यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.
* तालुका कृषी अधिकारी कार्यालय: ८९ सेवा पुरवण्यात आल्या.
* पुरवठा शाखा: १२४ शिधापत्रिकांचे वितरण.
* सेतू केंद्र: ७४ उत्पन्न दाखले, ३७ जातीचे दाखले, ६४ वय, अधिवास आणि रहिवास दाखले वितरित.
* ग्रामपंचायत विभाग: २९ जॉब कार्डचे वाटप.
* जननी सुरक्षा योजना: १७ लाभार्थ्यांना योजनेचा लाभ.
* लेक लाडकी योजना: ६ लाभार्थ्यांना योजनेचा लाभ.
* ICDS योजना: ७ लाभार्थ्यांना योजनेचा लाभ.
* ग्रामपंचायत मार्फत: १ वजनकाट्याचे वाटप.
* बांधकाम कामगार साहित्य वाटप: २ लाभार्थ्यांना साहित्य वाटप.
* मोफत पुस्तके वाटप: ८९ पुस्तकांचे वाटप.
* सार्वजनिक बांधकाम विभाग: ३ भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.
* शेतकऱ्यांना शेतकरी सुलभ योजना (जिवंत सातबारा मोहीम): २२ शेतकऱ्यांना लाभ.
* तुकडा शेरा कमी करणे मोहीम: ५२ प्रकरणे निकाली.
एकूण ९७९ लाभार्थ्यांना विविध विभागांमार्फत योजनांचा लाभ मिळाल्याने हे शिबिर यशस्वी ठरले.