जळगाव शहरातील भादली येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील भादली येथील तरुण घराच्या छतावर टीव्ही डिशचे काम करीत असताना शनिवारी दि. २५ मे रोजी तोल जाऊन खाली पडला होता. त्यात तो जबर जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार सुरु असताना ११ दिवसांनी त्याचा बुधवारी दि. ५ जून त्याचा दुपारी १ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रविण शिवदास कोळी (वय ३९, रा. भादली ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, २ मुले असा परिवार आहे. रिक्षा चालवून मिळणाऱ्या उत्पन्नावर तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. शनिवारी दि. २५ मे रोजी प्रवीण हे घरी टीव्हीच्या डिशचे काम करायला छतावर गेले होते. सिमेंटच्या पत्र्यावर चढले असता त्यांचा तोल गेला आणि ते १० ते १२ फुटांवरून खाली पडले. त्यात प्रवीण यांच्या मानेला, मणक्यांना जबर मार लागला होता.
त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचेवर खाजगी रुग्णालयात उपचार केले. ११ दिवसांनी खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी दि. ५ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास प्रवीण कोळी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे त्यांना दाखल करण्यात आले. दरम्यान, घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबियांना धक्का बसला आहे. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.