चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव शहराला हादरवून सोडणाऱ्या तरुणीच्या ब्लॅकमेलिंग प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी यश महेंद्र जैन याच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईलची प्राथमिक तपासणी केली असता, केवळ एका तरुणीचे नव्हे तर इतर अनेक मुलींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या नव्या खुलाशामुळे या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता व्यक्त होत असून, शहरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह फाईल्स साठवून ठेवल्या होत्या.
पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी सांगितले की,”तपासादरम्यान काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून आरोपीच्या मोबाईलमध्ये संशयास्पद फोटो आणि व्हिडिओ आढळले आहेत. मात्र, हे नेमके कोणाचे आहेत आणि यामागे मोठे रॅकेट आहे का, हे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल.”
दरम्यान, पोलिसांनी आरोपी यश जैन याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून, सायबर तज्ज्ञांच्या मदतीने मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणामुळे आता मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. आरोपीने याआधी किती मुलींना अशाच प्रकारे जाळ्यात ओढले होते?
सामाजिक प्रतिष्ठेच्या भीतीने अनेक मुली समोर येत नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत असून, यामागे कोणते मोठे जाळे किंवा पाठबळ आहे का, याचाही तपास सुरू आहे.
या धक्कादायक प्रकरणामुळे चाळीसगाव तालुक्यात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी होत असून, महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.









