१५ हजारांची स्प्लेंडर प्रो लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरातील घाटरोड परिसरात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोर उभी केलेली हिरो होंडा स्प्लेंडर प्रो ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण अर्जुन जाधव (वय २१, व्यवसाय – शेती, रा. पिंपरखेड तांडा, ता. चाळीसगाव) यांनी आपली हिरो होंडा स्प्लेंडर प्रो (क्रमांक MH-19-DC-9639) ही सुमारे १५ हजार रुपये किमतीची दुचाकी शहरातील घाटरोडवरील डॉ. राठोड यांच्या दवाखान्यासमोर उभी केली होती.
१८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. यानंतर फिर्यादीने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल पवन पाटील करीत आहेत.









