एरंडोल शहरातील भर दिवसाची घटना
एरंडोल (प्रतिनिधी) : येथे पद्मालय गॅस एजन्सीच्या समोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर डिव्हायडर जवळ २ अज्ञात इसमांनी पद्मालय गॅस एजन्सीचे कर्मचारी राजेंद्र पाटील यांच्याकडून भर दिवसा दि. २७ मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास चाकूचा धाक दाखवून एक लाख रुपये जबरीने लूट केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी दि. ३१ रोजी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
राजेंद्र पाटील हा एरंडोल येथील पद्मालय गॅस एजन्सीवर असिस्टंट मॅनेजर म्हणून वीस वर्षापासून नोकरी करतो. दि. २७ मे रोजी राजेंद्र पाटील हे नेहमीप्रमाणे गॅस एजन्सीचे ४ लाख ९१ हजार ५०० रुपयेचा भरणा करण्यासाठी एकटा दुचाकीने निघाला होता. बँकेत जात असताना दोन अज्ञात चोरट्यांनी विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकीने येत राजेंद्र उत्तम पाटील यांच्याजवळील पांढऱ्या रंगाच्या पिशवीतील एक लाख रुपये जबरीने लूटले. यावेळी एजन्सीच्या कर्मचाऱ्याने दोघांना प्रतिकार केला असता एकाने चाकूचा धाक दाखवून धमकी दिली.
त्यावेळी तिघांमध्ये झटपट झाली. आणि पांढऱ्या पिशवीमधील पाचशे रुपये दराच्या शंभर नोटांचे दोन बंडल खाली पडले. ते पैसे घेऊन दोघ चोरट्यांनी पळ काढला.यानंतर राजेंद्र पाटील याने गॅस एजन्सीचे मालक अशोक पाटील व एजन्सीच्या सहकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. या घटनेबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला पाच दिवसांनी शुक्रवारी दि. ३१ मे रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे हे करीत आहेत.