जळगावातील शनिपेठ परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या तरूणावर किरकोळ कारणावरून चॉपरने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शनी मंदिर परिसरात शुक्रवारी २८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता घडली आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमिरखान रहिमखान (वय-२७, रा. गेंदालाल मिल, जळगाव) हा तरूण परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून उदरनिर्वाह करतो. काही दिवसांपुर्वी सचिन जगन्नाथ शिंपी (वय-२२) याने अमिरखान याच्याकडे जेवण करण्यासाठी पैसे मागितले होते. अमीरने ते दिले नाही. त्याचा राग सचिन शिंपीच्या मनात होता. शुक्रवारी २८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील शनीमंदीर परिसरात अमिरखान रहिमखान याला सचिन शिंपी आणि त्याच्यासोबत सिध्दार्थ अरूण सुर्यवंशी हे भेटले. त्यावेळी अमिरने सचिनकडे दुर्लक्ष करत सिद्धार्थकडे बोलणे सुरु केले.
यामुळे चिडून सचिन शिंपी याने हातातील चॉपरने पोटावर वार करून अमीरला गंभीर जखमी केले. तसेच सोबत असलेला सिध्दार्थ अरूण सुर्यवंशी याने जखमी अमीरला कोणतीही मदत न करता दोघे पसार झाले. याप्रकरणी जखमी झालेल्या अमिरखान याने शनिवारी ३० सप्टेंबर रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार रात्री ९ वाजता दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहे.