अटकेतील संशयितांची संख्या झाली ६, शनिपेठ पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील भानू हॉटेलमध्ये जुन्या वादातून किशोर अशोक सोनवणे यांचा बुधवारी दि. २२ मे रोजी रात्री खून झाला होता. या प्रकरणी गुरुवारी चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. दरम्यान, शुक्रवारी शनिपेठ पोलिसांनी अजून दोन संशयितांना अटक केली. त्यात मुख्य संशयित आरोपी रुपेश सोनार याला अमळनेर येथून तर दुर्लभ कोळीला भुसावळ येथून अटक करण्यात आली आहे.
या खून प्रकरणी शनिपेठ पोलिस स्टेशनमध्ये किशोरचे वडिल अशोक श्रावण सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी गुरुवारी प्रशांत काकडे, रुपेश काकडे (वय २७), ईश्वर काकडे (वय २३), मयूर कोळी या चार संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने २७ पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान, शुक्रवारी अजून दोन संशयितांना अटक करण्यात आली. एक संशयित भुसावळला व दुसरा संशयित हा अमळनेरला असल्याची माहिती पोलिस कॉन्स्टेबल राहुल पाटील यांना मिळाली. त्यानुसार दोघांना अटक करण्यात आली. दोघांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भुसावळहून दुर्लभ कोळी याला शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर अमळनेर येथून मुख्य संशयित आरोपी रुपेश मनोहर सोनार याला अमळनेर रेल्वे स्टेशनवरुन अटक करण्यात आली. रुपेशकडे बॅग होती. तसेच तो बाहेरगावी पळून जाण्याचा तयारीत होता. दरम्यान, त्याच्याकडे चॉपर देखील आढळून आला आहे. रुपेश सोनार हा मुख्य संशयित आरोपी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. कारवाई एपीआय विठ्ठल पाटील, पीएसआय चंद्रकांत धनके, पोलिस कॉन्स्टेबल राहुल पाटील, किरण वानखेडे, अनिल कांबळे, राहुल घेटे, गजानन वाघ यांनी केली आहे.