चाळीसगाव शहरातील धक्कादायक घटना; १५ हजारांची रोकड लंपास
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- शहरातील जय शंकर नगर परिसरातील बारा ज्योतिर्लिंग मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून सुमारे १५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


रात्रीच्या अंधारात चोरट्यांचा डाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जय शंकर नगर येथील गजानन हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या बारा ज्योतिर्लिंग मंदिरात २६ मे रोजी रात्री ९ ते २७ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. मंदिरातील दोन दानपेट्यांचे कुलूप तोडून त्यामधील अंदाजे १५ हजार रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली.
भक्तांमध्ये संतापाचे वातावरण
धार्मिक स्थळात घडलेल्या या चोरीच्या प्रकारामुळे परिसरातील नागरिक व भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मंदिरातील दानपेटीच फोडल्याने सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल
याप्रकरणी वंदना सिताराम खोडपे (वय ५०, रा. लक्ष्मीनगर, चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपींचा शोध सुरू
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी पवन जाधव करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.









