भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील खडका गावाजवळील बंद असलेल्या मिलच्या आवारात ५९ वर्षीय महिलेवर अज्ञाताने हल्ला केल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. सूत्रांच्या माहितीनुसार, ही महिला मिलच्या आवारात विवस्त्र व रक्तबंबाळ अवस्थेत असल्याने तालुका पोलिसांना माहिती कळवण्यात आली. सुरूवातीला विविध अफवाही वर्तवण्यात आल्या मात्र प्रत्यक्षात महिलेच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात हल्लेखोर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
खडका येथील बंद सुतगिरणीत दोन रूम असून तेथे कोणीही राहात नाही. दोन खोल्यांच्या ओट्यावर रविवारी सकाळी एक महिला रक्तबंबाळ अवस्थेत विवस्त्र असल्याची माहिती मिळाल्यानंतर यंत्रणेने घटनास्थळी जाऊन जखमी अवस्थेत महिलेस ट्रामा केअर सेंटरला आणल्यानंतर प्राथमिक उपचार करून जळगावी उपचारार्थ हलवण्यात आले. डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी ट्रामा केअर सेंटरला भेट देऊन जखमी महिलेची पाहणी केली. महिलेने शुद्धीवर आल्यानंतर कुणीही हल्ला केला नसल्याचे व स्वतःच कपडे काढल्याचे सांगितले तर महिलेच्या बहिणीने या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक निरीक्षक रूपाली चव्हाण, उपनिरीक्षक पूजा अंधारे आदींनी जवाब नोंदवला.