रायसोनी नगरातील घटना; बहिणीच्या लग्नानंतर कुटुंबावर शोककळा
जळगाव (प्रतिनिधी):- रायसोनी नगर परिसरात बीटेकच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. हेमंत प्रदीप जाधव (वय २०, रा. रायसोनी नगर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हेमंतचे आई-वडील नोकरीनिमित्त बाहेर गेले होते. घरात एकटाच असताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास त्याचे वडील घरी परतले असता हेमंत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाइड नोट मिळून आली असून ती जप्त करण्यात आली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
विशेष म्हणजे, हेमंतच्या बहिणीचे लग्न नुकतेच २८ एप्रिल रोजी पार पडले होते. घरात आनंदाचे वातावरण असतानाच घडलेल्या या घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.









