हुंड्यासाठी छळ झाल्याने माहेरच्यांनी दिली तक्रार
बोदवड (प्रतिनिधी) : येथील शहरातील माहेरवाशिणीचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला. सासरच्यांनी नणंदेच्या लग्नासाठी दोन लाख रुपये हुंडा आणावा यासाठी छळ सुरू केला. तर पतीचे विवाहबाह्यसंबंधही होते. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनला सासरच्या मंडळींवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोदवड शहरातील रूपनगरमधील राजू नारायण तेली यांची मुलगी चैताली हिचे लग्न तीन महिन्यांपूर्वी संभाजीनगर येथील केतन इंगळे याच्यासोबत झाले होते. नणंदेच्या लग्नासाठी २ लाख आणावे यासाठी चैतालीचा सासरमध्ये छळ केला जात होता. तिच्या पतीचे विवाहबाह्यसंबंध होते,याबाबत तिने वडिलांना सांगितले होते. बुधवारी वडिलांनी तिला फोन केला असता, उचलला नाही. तिचा सासरा राजेंद्र इंगळे यांच्याशी संपर्क केला असता तुमच्या मुलीने गळफास घेतल्याचे सांगितले. तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
नवविवाहितेचा २ लाख रुपयांसाठी तिचा पती केतन राजेंद्र इंगळे (वय २७), सासू कुसुमबाई इंगळे (वय ४५), सासरे राजेंद्र इंगळे (वय ५६), नणंद धनश्री (वय २४), नणंद नम्रता (वय २२) यांनी त्रास दिला व मुलीचे आयुष्य संपल्याची तक्रार चैतालीच्या वडिलांनी दिली आहे. या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम ८० (२) नवविवाहिता हुंडाबळी कलम ८५ छळ, ११५ (२) दुखापत करणे, ३५२ शिवीगाळ करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.