तामिळनाडूच्या चालकावर गुन्हा दाखल
भुसावळ (प्रतिनिधी) : नाडगाव, ता.बोदवड रेल्वे स्थानकावरील बंद असलेल्या गेटमधून धान्याचा भरधाव ट्रक डाऊन लाईनवरून जाणार्या अमरावती एक्स्प्रेसच्या इंजिनावर जावून धडकल्याने ट्रकचे तुकडे-तुकडे होऊन अपघात झाला होता. अपघात शुक्रवार दि. १४ मार्च रोजी सकाळी पहाटे साडेचार वाजता घडला. रेल्वे इंजिनासह मालमत्तेचे १५ लाख ५४ हजारांचे नुकसान झाले आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीची यंत्रणा अपातस्थळी रवाना केल्यानंतर सकाळी १० वाजेच्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यात यश आले.
डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते अमरावती डाऊन एक्सप्रेस (१२१११) ही गाडी शुक्रवारी पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान बोदवड रेल्वे गेट जवळून जात असताना भरधाव धान्याने भरलेला ट्रक बंद असलेले रेल्वे गेट पार करून टॅ्रकवर आला व याचवेळी इंजिनाची धडक जोरदार बसल्याने ट्रकचे जागेवरच तुकडे-तुकडे झाले.(केसीएन)रेल्वे लोकोपायलटच्या हा प्रकार लक्षात येताच त्याने इर्मजन्सी ब्रेकचा वापर केल्याने जागेवरच गाडी थांबली व अचानक लागलेल्या ब्रेकमुळे पहाटेच्या साखर झोपेतील प्रवासी बर्थवरून खाली कोसळले. अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाने जागेवरून धूम ठोकली. नाडगाव रेल्वे स्थानकाजवळील खांबा किलोमीटर क्रमांक ४७४/३४-३६ येथे घडलेल्या अपघातामुळे ओव्हरहेड इलेक्ट्रिक (ओएचई) वायर डाउनस्ट्रीमला नुकसान झाले तर रेल्वे प्रशासनाने लाईन क्लिअरिंग ऑपरेशन्ससाठी ताबडतोब क्रेन आणि कार्गो तैनात केला. ओएचई दुरुस्तीच्या कामासाठी मलकापूरहून एक टॉवर वॅगन आला तर मदतीसाठी एक डिझेल इंजिन पाठवण्यात आले. हायड्रा क्रेनद्वारे अपघातग्रस्त इंजिन बाजूला करण्यात आले तर ट्रकही बाजूला करण्यात आला.
रेल्वे अपघातानंतर प्रवाशांना मदत करण्यासाठी विविध रेल्वे स्थानकांवर “मी तुम्हाला मदत करू शकतो का” ही सेवा सुरू करता आली. भुसावळ, वरणगाव, बोदवार, मलकापूर, शेगाव आणि अकोला स्थानकांवर नाश्ता आणि पाणी वाटप करण्यात आले. रेल्वे प्रशासनाने बोदवड स्थानकावर प्रवाशांसाठी सहा बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली. डाऊन मार्गावरील १२८४४ अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस, २२१३८अहमदाबाद-नागपूर एक्स्प्रेस, १२८०९ मुंबई-हावडा व्हाया नागपूर मेल,(केसीएन)२२१४१ पुणे-नागपूर हमसफर एक्स्प्रेस या भुसावळ रेल्वे सेक्शनमध्ये थांबवून ठेवण्यात आल्या शिवाय गाडी क्रमांक १८०२९ मुंबई-शालिमार, १२२६१ मुंबई सीएसएमटी-हावडा एक्स्प्रेस, १२६५५ नवजीवन अहमदाबाद, ११०३९ महाराष्ट्र एक्स्प्रेस खंडवा, इटारसी नागपुरमार्गे वळविण्यात आल्या. शनिवारी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यात यश आले.
अपघात प्रकरणी मलकापूर आरपीएफचे उपनिरीक्षक बी.जे.सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक पुवरसन अतिमूलम (वय २५, ६४ एमजीआर, नगर कम्बेनल्लूर, कोरोमंगलम, जि.धरमपूरी, तामिलनाडू) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास स्थानिक बोदवड पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली.(केसीएन)संशयित आरोपी ट्रक चालकाने चौकशीत सांगितले की, खंडवा येथून धान्य घेवून तमिळनाडूकडे निघालो होतो मात्र रेल्वे गेटजवळ ब्रेक फेल झाल्याने ट्रक रेल्वे रूळावर जावून इंजिनाला धडकला. या अपघातात रेल्वेचे १५ लाख ५४ हजार ९५३ रुपयांचे नुकसान झाले. अधिक तपास निरीक्षक जसबीर राणा करीत आहेत.