बोदवड शहरातील घटना
बोदवड (प्रतिनिधी) : शहरातील विद्यानगर कॉलनीमध्ये राहणाऱ्या भावना दीपक मंदवाडे (वय ३०) या विवाहितेने घरात आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या महिलेची दोन्ही मुले सकाळी झोपेतून उठली. त्यावेळी त्यांना आई गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या विवाहितेचे माहेर चुंचाळे, ता. यावल येथील आहे. घटना घडली त्यावेळी महिलेचा पती घरी नव्हते.नातलगांनी मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत संताप व्यक्त केला आणि गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. याबाबत पोलिसात लेखी तक्रार देण्यात आली आहे. बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमित पाटील हे करत आहेत.