शासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ मदत देण्याचे आवाहन
बोदवड (प्रतिनिधी) : अचानक आलेल्या वादळ आणि अवकाळी पावसाने बोदवड तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली. घरांवरील पत्रे उडून गेली. त्यामुळे घरातील संसारपयोगी वस्तूंचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून अनेकांचे संसार उघडयावर पडले आहेत. दुष्काळी छायेत असताना विहिरीत असलेल्या कमी जलसाठ्याच्या सहाय्याने जिवापाड मेहनत घेऊन शेतकरी बांधवांनी घेतलेल्या रब्बीच्या गहू, हरभरा, मका, ज्वारी ,केळीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतातील पिके भुईसपाट झाले आहेत.
काढणीवर आलेले पिके भुईसपाट झाल्यामुळे शेतकरी बंधूंचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी बांधव संकटात सापडला असुन उद्विग्न झाला आहे. जलचक्र बु येथे जि. प .प्राथमिक शाळेवरील पत्रे उडून गेल्यामुळे शैक्षणिक साहित्य भिजून मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे बोदवड शहरातील कृषी पुरक उद्योग असलेल्या जिनिंग व्यावसायिकांचे सुद्धा मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. हरणखेड येथे विज कोसळून कापूस जळाल्याने शेतकरी बांधवांना आर्थिक झळ बसली आहे. बोदवड तालुक्यातील वाकी, वराड, जलचक्र, मुक्तळ येथे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी नुकसानीचे सरसकट पंचनामे करून आचारसंहिता बाजूला ठेऊन नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.