कुटुंबीयांचा रुग्णालयात आक्रोश
जळगाव (प्रतिनिधी) : येथील पोलीस वसाहतीमधील २५ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. ही घटना मंगळवार दि. ९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सोहेल रफिक तडवी (वय २५, रा. पोलीस वसाहत, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील हे जळगावातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. पोलीस वसाहतीत खोली क्रमांक ५ मध्ये सोहेल हा परिवारासह राहत होता. सोमवारी दि. ८ रोजी त्याने कुटुंबियांसोबत जेवण झाल्यावर तो वरच्या मजल्यावरील खोलीमध्ये झोपण्यासाठी गेला होता. मध्यरात्रीच्या सुमारास सोहेल याने गळफास घेत आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी बराच वेळ झाला तरी सोहेल खाली न आल्यामुळे त्याची आई त्याला उठविण्यासाठी गेली असता त्यांना मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
मुलाचा मृतदेह बघताच त्याच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडीत आक्रोश केला. त्यानंतर सोहेल याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता याठिकाणी सीएमओ डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासणीअंती सोहेल याला मयत घोषीत केले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.