जळगावातील तुकारामवाडी येथे केली होती घराची तोडफोड
जळगाव (प्रतिनिधी) : जुन्या वादातून २०२२ मध्ये सुरेश ओतारी व अरुण गोसावी यांच्यावर शासकीय रुग्णालयाजवळ खुनी हल्ला झाला होता. त्यात सुरेश ओतारी याचा मृत्यू झाला होता. तर अरुण गोसावी जखमी होता. आता दि. ६ एप्रिल २०२४ रोजी अरुण गोसावी याच्या घरावर रात्री पुन्हा त्याच हल्लेखोरांनी खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांच्या घराची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने एक दिवसासाठी संशयित आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
सन २०२२मध्ये अरुण गोसावी आणि सुरेश ओतारी यांना काही तरुणांनी जबर मारहाण केली होती. मारहाणीत सुरेश ओतारी यांचा मृत्यू झाल्याने पाच जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यात पाच जणांना अटकदेखील करण्यात आली होती. या प्रकरणी फिर्याद अरुण गोसावी याने दिली होती. आता दि. ६ एप्रिल २०२४ रोजी रात्री ११:४५ वाजेच्या सुमारास खुनातील काही संशयित हे अरुण गोसावी घरी गेले. तेथे संशयित आरोपी भूषण विजय माळी उर्फ भाचा, आकाश उर्फ सुकलाल खंड्या ठाकूर, पवन दिलीप बाविस्कर उर्फ बद्या, सचिन कैलास चौधरी उर्फ टिचकुल्या, आकाश रविंद्र मराठे उर्फ ब्रो, चेतन रमेश सुशीर उर्फ बटाट्या (वय २०) यांनी गोसावी यांच्या घरावर हल्ला केला.
सर्वांनी घरावर दगडफेक करीत लाठ्याकाठ्यांनी साहित्याची तोडफोड केली. यावेळी भूषण माळी याने ‘तू कसा आमच्याविरुद्ध केस चालवतो, तुला बघतो, आज तुझा मर्डरच करतो’ अशी धमकी दिली. त्यानंतर सर्वजण घराच्या पहिल्या मजल्याच्या दिशेने जात होते. हल्लेखोरांच्या हातात कोयता आणि लाठ्याकाठ्या असल्याने अरुण गोसावी हे मागील दरवाजाने निघून गेले. संशयितांनी घराचा मुख्य दरवाजा तोडून घरातील साहित्याचीदेखील तोडफोड केली. याप्रकरणी अरुण गोसावी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भूषण माळी, आकाश ठाकूर, पवन बाविस्कर, सचिन चौधरी, आकाश मराठे, चेतन सुशिर या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर सहा संशयित आरोपीना वाघ नगर परिसरातून एमआयडीसी पोलीस स्टेशनने अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सपोनि महेंद्र वाघमोरे, पोउनि दत्तात्रय पोटे, पोउनि दीपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, ललित नारखेडे, छगन तायडे, किरण पाटील, नितीन ठाकूर, साईनाथ मुंढे, गणेश ठाकरे, संजीव मोरे आदींनी हि कारवाई केली आहे.