धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील घटना
शिरपूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात माय लेकीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. जासन मातेचे दर्शन घेऊन मोटरसायकलवरुन चोपड्याला घरी परताना रस्त्यावरील खड्ड्यामुळे हा अपघात घडला आहे. संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
चोपडा येथील मनोज शिंदे हे पत्नी सुलोचना मनोज शिंदे आणि २ वर्षीय मुलगी नेहल मनोज शिंदे यांच्यासोबत मोटरसायकलवरुन बिजासन माता मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येत असतानाच मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील पळासनेर गावाजवळ त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. पळासनेर गावाजवळ आल्यानंतर एक खड्डा आल्याने मनोज शिंदे यांनी मोटरसायकलचा वेग हळू केला. त्याचवेळी मागून येणाऱ्या वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत सुलोचना शिंदे आणि मुलगी नेहल शिंदे रस्त्यावर कोसळले. यादरम्यान मागून येणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने नेहल शिंदे आणि सुलोचना शिंदे यांना चिरडले.
यात चिमुकल्या नेहलचा जागीच मृत्यू झाला, तर सुलोचना शिंदेंच्या दोन्ही पायांवरुन वाहन गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेच्या मदतीने पती, पत्नीसह दोन वर्षांच्या मुलीला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान सुलोचना शिंदे यांचा देखील मृत्यू झाला. एकाच वेळी पत्नी आणि लेकीच्या मृत्यूनंतर मनोज शिंदे यांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, चोपड्यात शोककळा पसरली आहे.