चाळीसगाव तालुक्यातील गणेशपुर पिंपरी येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : गणेशपुर पिंपरी येथे एका १३ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला असून यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना शनिवारी दिनांक १४ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वनविभागाची टीम माहिती घेत आहे.
मयताचे नाव रिंकेश नंदू मोरे असे आहे. रिंकेश मोरे हा गणेशपुर-पाटणा रस्त्यावर काही मित्रांसोबत रनिंगसाठी गेला होता. चार मित्र रनिंग करत पुढे गेली व रिंकू मागे रनिंग करत असताना, अचानक शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला आणि ओढत शेतात नेले. (केसीएन)पुढे रनिंग साठी गेलेल्या मुलांना आपला मित्र दिसत नसल्यामुळे त्यांनी शोधाशोध केली, परंतु तो मिळून आला नाही.
याबाबतची माहिती घरी जाऊन मुलांनी दिली असता आई-वडील त्याला शोधायला गेले. प्रकाश काशिनाथ पाटील यांच्या शेतात मृत अवस्थेत रिंकू आढळून आला. या घटनेमुळे परिवाराने एकच आक्रोश केला. रात्री उशिरापर्यंत वन विभागाकडून पंचनामा सुरू होता. (केसीएन)दरम्यान याच ठिकाणी सकाळी बिबट्याने बकरी फस्त केल्याची माहिती मिळत आहे. गेल्या सहा ते सात वर्षांपूर्वी चाळीसगाव तालुक्यात सायगाव परिसरात नरभक्षक बिबट्याने तब्बल सहा जणांचा बळी घेतला होता. त्याला ठार करण्यात आले.त्याच आठवणी आता पुन्हा ताज्या झाल्या आहेत.