प्रेयसीचा जागीच मृत्यू, प्रियकरावर धुळ्यात उपचार सुरु
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील बोढरे येथील प्रेमीयुगुलाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दि. ७ जून रोजी रात्री दीडच्या सुमारास येथील रेल्वेस्थानकाजवळ घडली. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला असून, मुलाचा पाय कापले गेल्याने त्याच्यावर धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी येथील रेल्वे पोलिसांत नोंद झाली आहे.
बोढरे येथील रिक्षाचालक सचिन गणपत चव्हाण (वय २२) याचे गावातील त्याच्याच जवळच्या नात्यातील शीतल रामसिंग चव्हाण ( वय १९) हिच्याशी प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्नाचा विचारही केला होता. मात्र, ते नात्यातील असल्याने त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला. आपले लग्न होणार नसल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचे ठरविले. त्यानुसार गुरुवारी दि. ६ ला रात्री दोघांनी गावातून पलायन केले व चाळीसगाव गाठले.
बोढरे येथे रात्री मुलगी घरी न परतल्याने घरच्यांनी तिचा शोध सुरू केला. मात्र, मुलगी कुठेही मिळून आली नाही. दरम्यान, घरून पळून गेलेले सचिन व शीतल यांनी चाळीसगाव रेल्वेस्थानकावर येऊन रात्री दीडच्या सुमारास धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून दिले. यात शीतलचा जागीच मृत्यू झाला. सचिनचा मात्र एकच पाय रेल्वेखाली सापडल्याने तो कापला गेला. रेल्वे निघून गेल्यावर सचिनने जखमी अवस्थेत त्याच्या मोबाईलवरून बोढरेत भावाला कळविले.
त्यानंतर त्याच्या नातलगांसह इतरांनी चाळीसगावला धाव घेऊन जखमी सचिनला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्या दुसऱ्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबत स्टेशन मास्तरांनी रेल्वे पोलिसांना दिलेल्या माहितीवरून नोंद झाली आहे. हवालदार गोपालकृष्ण सोनवणे तपास करीत आहेत.