जळगाव ( प्रतिनिधी ) – भु-विकास बँकेच्या कर्जदारांचे संपूर्ण कर्जमाफ करण्याच्या निर्णय शासनाने ९ नोव्हेंबर, २०२२ रोजी घेतलेला आहे. या शासन निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यात एकुण २२७ कर्जदार शेतकरी सभासदांचे संपुर्ण कर्जमाफ झालेले आहेत. या शेतकऱ्यांचे सातबारा उत्ताऱ्यावरील कर्जाच्या बोज्याची नोंद कमी करणेबाबतचा प्रस्ताव बँकेचे अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक सह संस्था, जळगाव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांस सादर केला होता.
त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ५ एप्रिल, २०२३ रोजी जिल्ह्यातील सर्व तहसिलदार यांना भूविकास बँकेच्या कर्जाची सातबारा वरील बोज्याची नोंद कमी करण्याबाबत तहसिलदार यांनी तलाठी व मंडळ अधिकारी यांना कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आल्या आहेत.
तरी संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या सातबारा उत्ताऱ्यावरील भूविकास बँकेच्या कर्जाचा बोजा निरस्त करण्यासाठी संबंधित तहसीलदार, तलाठी/मंडळ अधिकारी यांचेशी संपर्क साधावा व आपल्या सातबारावरील बोजा निरंक करण्यात यावा. असे आवाहन बँकेचे अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव यांनी केले आहे.