भुसावळ – भुसावळचा १२ वीत शिकणारा विद्यार्थी रिद्धेश अनंत बेंडाळे याची आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाड (आयपीएचओ) २०२५ पॅरिस (फ्रान्स) साठी निवड झाली आहे. ही निवड होमी भाभा सेंटर फॅार सायन्स अँन्ड एज्युकेशन ,मुंबई द्वारे करण्यात आली आहे.
रिद्धेश हे डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे भुसावळ येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. अनंत बेंडाळे आणि कान नाक घसा तज्ञ डॉ. पंकजा बेंडाळे यांचे सुपुत्र आहेत. त्याने आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने देशभरातून हजारो विद्यार्थ्यांतून हे यश मिळवले आहे.जुलै २०२५ मध्ये पॅरिस येथे होणार्या या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून पहिल्या पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. या यशामुळे भुसावळ शहरासह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटत आहे. रिद्धेशने या यशाचे श्रेय आपल्या पालकांच्या व ज्येष्ठ बंधू अथर्व यांच्या मार्गदर्शनाला आणि शिक्षकांच्या पाठिंब्याला दिले आहे.त्याच्या यशाबददल संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील सचिव डॉ.वर्षा पाटील,सदस्य डॉ. केतकी, डॉ वैभव,डॉ. अनिकेत, डॉ अक्षता पाटील यांनी अभिनंदन केले आहे. रिद्धेशला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे !!