भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील यावल रोडवरील साईचंद्र नगरातील बंद घर फोडत चोरट्यांनी 24 ग्रॅम सोन्यासह तीन हजारांची रोकड लांबवली. ही घटना 14 रोजी दुपारी 12.30 ते 16 एप्रिल रोजी रात्री 11 दरम्यान घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल रोडवरील साईचंद्र नगरात योजना संजय पाटील (38) या पती संजय पाटील व मुलासह वास्तव्यास आहेत. पाटील दाम्पत्य गावाला गेल्याने घराला 14 ते 16 एप्रिलदरम्यान कुलूप होते. चोरट्यांनी संधी साधत घराला लावलेले कुलूप तोडून लोखंडी कपाटातील तीन हजारांची रोकड, 42 हजार रुपये किंमतीची व 17 ग्रॅम वजनाची सोन्याची चीप, दोन ग्रॅम वजनाची व 2800 रुपये किंमतीची सोन्याची चीप, एक हजार रुपये किंमतीचा चांदीचा शिक्का, असा एकूण 68 हजार 800 रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. योजना पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय मो.अली सैय्यद करीत आहेत.