भुसावळात बंद फ्लॅट फोडून दीड लाखांहून अधिकचे दागिने लंपास
भुसावळ (प्रतिनिधी):- शहरातील समृद्धी हाइट्स परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून दीड लाखांहून अधिक किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी दिलीप रणविजय गुप्ता (वय ५५) हे आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. दि. १ मे ते ११ मे दरम्यान त्यांचा फ्लॅट बंद होता. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी बेडरूममधील कपाट उघडून त्यातील सोन्याचे ब्रेसलेट, चैन, अंगठ्या, लॉकेट, मंगळसूत्र तसेच चांदीचे दागिने चोरून नेले. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले पाहून चोरीचा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.









