
भुसावळ, जामनेर व अमळनेरमधील ६ दुचाकी चोरीचे गुन्हे उघड; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत
भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरीच्या मालिकेचा यशस्वी छडा लावत एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. आरोपीकडून एकूण ६ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्याने भुसावळ शहरासह जामनेर व अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.


दि. २३ जानेवारी २०२६ रोजी भुसावळ शहरातील झेडटीएस रोडवरील एमओएच पार्किंग शेड येथून फिर्यादी विजय जगन्नाथ खडके (वय ४५, रा. मोहित नगर, भुसावळ) यांची हिरो मोटोकॉर्प कंपनीची एमएच-१९-ईके-२३५० क्रमांकाची काळ्या रंगाची (ग्रे पट्टे असलेली) मोटारसायकल अज्ञात व्यक्तीने चोरून नेली होती. या प्रकरणी दि. २७ जानेवारी २०२६ रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रभारी पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांना गुन्ह्याचा तातडीने छडा लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुप्त माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि संशयितांवर पाळत ठेवून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपी चोपडा बसस्थानक परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले व पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सापळा रचून विशाल राजेंद्र राठोर (वय ४६, रा. सरदार वल्लभ मार्ग, अमनखेड रोड, गणेश मंदिराजवळ, वॉर्ड क्र. १, भिकनगाव, जि. खरगोन, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले.
सखोल चौकशीदरम्यान आरोपीने भुसावळ शहर, जामनेर आणि अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ६ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी चोरीच्या सर्व दुचाकी जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक अब्दुल रज्जाक खान, पोलीस कॉन्स्टेबल सुबोध मोरे, राहुल बेहेनवाल, कुणाल सोनवणे, दीपक पाटील यांनी ही उल्लेखनीय कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.









