पाचोरा तालुक्यातील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सावखेडा येथील भैरवनाथ मंदिराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी जवळपास ७० हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना १ फेब्रुवारीला उघडकीस आली. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावखेडा येथील भैरवनाथ मंदिरातील गाभाऱ्याच्या दरवाजाचे चोरट्यांनी कुलूप तोडून १ फेब्रुवारीला पहाटे ३.१५ ते ५ वाजेदरम्यान जवळपास ७० हजारांचा ऐवज लांबवून नेला. चोरट्यांनी गाभाऱ्यातील तिन्ही मूर्तीवरील चांदी मिश्रित धातूच्या ६४ हजार रुपये किमतीच्या २ किलो २५० ग्रॅमच्या तीन छत्र्या तसेच मंदिरातील ४ दानपेटींमधील ५ हजार ५०० रुपये रोख अस एकूण ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. ही घटना सकाळी ५ वाजेच्या सुमारास पुजारी रामचंद्र परदेशी यांच्या लक्षात आली. या बाबत मंदिर संस्थानचे सदस्य प्रकाश नारायण परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.