मंदिराजवळील घराचे कुलूप तोडून चोरट्यांचा डल्ला; ४ लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज चोरीला
भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, भुसावळ शहरातील तुकाराम नगर परिसरात, मंदिराजवळील घरात ही चोरी झाली. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपासून ते १८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.४७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घर फोडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
चोरट्यांनी घरातील कपाट उघडून त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेली. चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू तसेच रोख रकमेचा समावेश आहे. या घटनेत एकूण सुमारे ४ लाख २३ हजार १२५ रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.
घरफोडीची घटना उघडकीस आल्यानंतर संबंधितांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) आणि ३३१(३) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.








