जळगाव तालुक्यातील ममुराबाद रस्त्यावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील ममुराबाद गावाजवळ कुत्रा रस्त्यात आडवा आल्याने भरधाव एसटी बसने दुचाकीला जबर धडक दिली. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती झाडावर आदळली. या अपघातात दुचाकीवरील दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आलम शेख (वय २८) आणि सादिक जुम्मा पिंजारी (वय २०, दोघे रा. आझाद नगर, पिंप्राळा, जळगाव) हे दोघे रोजा सोडण्यासाठी बुधवारी दि. २७ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक (जीजे ०६ केई ०५४२) ने जळगावला जात होते. त्यावेळेला भरधाव एसटी बस क्रमांक (एम एच १४ बी टी २२१६) समोर कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्याने पुढील दुचाकीला जबर धडक दिली व त्यानंतर झाडाला एसटी धडकली.
या जबर अपघातात दुचाकीवरील आलम शेख व सादिक पिंजारी हे जबर जखमी झाले. त्यांना आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले. तेथे दोघांवरही उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते.