पारोळा तालुक्यातील विचखेडा गावाजवळ घडली घटना
पारोळा (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील विचखेडे गावाच्या अलीकडे धुळ्याकडे जाणारी स्विफ्ट कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने ही कार रस्त्याच्या कडेला सुमारे पाचशे फूट फेकली गेली. त्यात एक जण जागीच मरण पावला तर दुसरा धुळे येथे नेत असतांना वाटेतच मरण पावला. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. १७ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता घडली आहे.
धुळ्याकडे जाणारी स्विफ्ट कार क्रमांक एम एच-१९ सी एफ-११९० यात निलेश सुरेश पाटील (वय २५), गोविंद भास्कर राठोड (वय २६), राहुल भाऊसाहेब आहिरे ( वय २४, तिघे रा.तरवाडे ता. जिल्हा धुळे), महेश आत्माराम देवरे पाटील (वय २४,मोंढाळे प्र. अ. तालुका पारोळा) हे धुळ्याकडे जात असताना पारोळा शहरानजीक असलेल्या वीचखेडा गावाच्या अलीकडे कार वरील चालकाचा ताबा सुटला.
कार रोडच्या कडेला चार पलट्या खाऊन पाचशे फुटावर थांबली. त्यात राहुल पाटील याचा जागीच मृत्यू झाला तर निलेश पाटील याचा धुळे येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. तर महेश देवरे, गोविंदा वंजारी हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेत पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील गोविंदा वंजारी हे गंभीर जखमी असल्याने त्यांना धुळे येथे हलविण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.