जळगाव शहरातील रेमंड चौकातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील रेमंड चौफुलीवर भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात कारने जोरदार धडक दिल्याने पायी जात असलेल्या तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी १० मार्च रोजी रात्री ११.३० वाजता घडली होती. खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना तरूणाचा सोमवारी ११ मार्च रोजी सकाळी ९ वाजता मृत्यू झाला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भुषण पवनकुमार जैन (वय ३४ रा. शिवराम नगर, जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. भुषण जैन हा तरूण आपल्या आई पवनाबाई यांच्यासोबत शिवराम नगरात वास्तव्याला होता. तो मुंबईत खासगी नोकरीला होता. तरूणाच्या पश्चात आई आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. काही दिवसांपासून भूषण हा घरी जळगावात आलेला होता. रविवारी १० मार्च रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास रेमंड चौफुलीवरून तो पायी जात असतांना त्याला अज्ञात कारने जोरदार धडक दिली. या अपघातात भूषण हा गंभीररित्या जखमी झाला. त्याला जळगाव शहरातील खासगी रूग्णालयात उपाचारार्थ दाखल करण्यात आले होते.
त्याच्यावर उपचार सुरू असतांना सोमवारी ११ मार्च रोजी सकाळी ९ वाजता त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालात दाखल करण्यात आला. याठिकाणी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.