अमळनेर शहरात महिलेला सायबर गंडा
अमळनेर (प्रतिनिधी) :- शहरातील सराफ बाजार परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला बुकींग केलेले पार्सल घरी पोहोचण्याच्या नावाखाली बँक खात्यातून ९९ हजार ४९० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या संदर्भात रविवार दि. १७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगिता राकेश भामरे (वय-३५, रा.सराफ बाजार, अमळनेर) या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यांनी दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मोबाईलच्या फेसबुक अकाऊंटवरून ऑनलाईन कपडे विक्री करणाऱ्या एका अकाऊंटवरून लेडीज कुर्ता घेण्याची ऑर्डर दिली होती. ती ऑर्डर २ डिसेंबरपर्यंत घरापर्यंत येणार होती. दरम्यान दिलेली ऑर्डरचे पार्सल घरी आले नाही, त्यामुळे त्यांनी गुगलवर कुरिअर ट्रॅकिंगची लिस्ट शोध घेत मोबाईल क्रमांक मिळविला. त्यावर कॉल करून विचारणा केली असता समोरील अज्ञात व्यक्तीने काही तांत्रिक कारणामुळे पार्सल अडकल्याचे सांगून दिलेल्या एका फाईलवर क्लिक करण्याचे सांगितले.
दरम्यान महिलेने फाईलवर क्लिक केल्यानंतर त्यांचे बँक खात्यातून पहिल्यावेळी ९५ हजार रूपये आणि दुसऱ्या वेळेस ४ हजार ४९० रुपये असे एकूण ९९ हजार ४९० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने रविवार १७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे हे करीत आहे.