डॉ. उल्हास पाटील यांचेसह तिघांचा पत्रपरिषदेत सवाल
जळगाव (प्रतिनिधी) :- आमच्याशी कुठलीच चर्चा न करता आमचे निलंबन करणे चुकीचे आहे. माझी मुलगी केतकी पाटीलला मोदींचे विचार, त्यांचे कार्य आवडते तिला भाजपाला जायचे आहे. मात्र त्यात माझे व देवेंद्र मराठे याचे निलंबन का करण्यात आले ? काँग्रेसमध्ये ही एकाधिकारशाही आहे. हि लोकशाही नाही. माझ्याशी कधीच चर्चा करण्यात आली नाही, अशी माहिती पत्रकार परिषदेत डॉ. उल्हास पाटील यांनी सोमवारी २२ रोजी दिली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, त्यांच्या पत्नी डॉ. वर्षा पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी २२ जानेवारी रोजी याबाबत पत्र जारी केले आहे. याबाबत डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, देवेंद्र मराठे यांनी सोमवारी पत्रपरिषद घेऊन भावना व्यक्त केल्या.
डॉ. उल्हास पाटील म्हणाले, मला आता दुसरा मार्ग बघायला हवा. तो मार्ग लवकरच कळवू. कन्या केतकीबाबत भाजपचे मी सांगितले. माझ्याबाबत मी काहीही सांगितलेले नाही. मात्र माझे निलंबन करणे याचा काहीही संबंध नाही. मी काँग्रेस सोडून इतर कुठल्याही पक्षात गेलेलो नाही. तरीही निलंबनाचे आदेश काढणे चुकीचे आहे. देवेंद्र मराठे म्हणाले की, पक्षातून तुम्हाला काढता येणार नाही, असे मला प्रदेश युवा अध्यक्षांनी सांगितले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कारवाई चुकीची आहे. त्याबाबत वरिष्ठांकडे चर्चा सुरु आहे.