रावेर लोकसभेसाठी तयारी पूर्ण
जळगाव (प्रतिनिधी) :- पुढील महिन्यात कोणत्याही तारखेला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे इच्छुकांची मोर्चेबांधणी जोरदार सुरु आहे. आता डॉ. केतकी पाटील यांचा बुधवारी भाजपात पक्षप्रवेश सोहळा असून त्यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे भाजपकडून डॉ. केतकी यांच्या रूपाने सुशिक्षित चेहरा दिला जाणार असल्याची चर्चा आहे.
डॉ. केतकी पाटील यांनी रावेर मतदारसंघात सर्वत्र दौरे सुरु केले असून जनतेशी गाठीभेटी घेत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. तसेच, मतदारसंघाचा सविस्तर भौगोलिक व सर्वांगीण अभ्यास करीत असून “दिल्ली” जाण्याकरिता त्यांच्यासाठी पोषक वातावरण देखील तयार झाले आहे. रावेर लोकसभामध्ये डॉ. केतकी पाटील यांचे पिता डॉ. उल्हास पाटील यांचा जनसंपर्क दांडगा असून त्याचा फायदा होणार आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघातील २०० पेक्षा अधिक गावांमध्ये केतकी पाटील यांनी भेटी दिल्या आहे. गावागावात जाऊन लोकांकडून माहीती जाणून घेताहेत. लोकसभेसाठी डॉ. केतकी यांना विविध समाजांकडून तसेच सामाजिक संघटनेकडून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. तसेच, शिवसेना शिंदे गटाकडूनदेखील त्यांना सहकार्य मिळण्याची मोठी शक्यता आहे.