
नऊ आरोपींना अटक; सोलर वायर, मोबाईल, मोटारसायकल, फोर-व्हीलर व कटरसह मोठा ऐवज हस्तगत
भडगाव ( प्रतिनिधी ) – भडगाव पोलिसांनी सोलर प्लांटमधील कॉपर वायर चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत छडा लावत नऊ जणांच्या टोळीला अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे ५ लाख १५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे परिसरातील सोलर प्लांट चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२६ रोजी रात्री गस्तीदरम्यान पोहेकॉ. सुशील सोनवणे यांना तीन संशयित इसम आढळून आले. चौकशीदरम्यान त्यांनी आणखी साथीदारांसह भडगाव रोडलगत असलेल्या सोलर प्लांटमधून कॉपर केबल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून इतर आरोपींनाही ताब्यात घेतले.
या कारवाईत जानकीराम भागवत मोरे (२२), रवी सोमा भिल (२२), सुका संजय भिल (१९), अनिल अर्जुन भिल (२७), शुभम सुरेश भोई (२३), योगेश दिगांबर भिल (२०), संजय नारायण सोनवणे, (४८) आणि जितू यशोनाथ पवार (२०) या नऊ आरोपींना अटक करण्यात आली. सर्व आरोपी इंदिरा नगर, शिरसोली (ता. जि. जळगाव) येथील रहिवासी आहेत.
आरोपींकडून सुमारे ४ हजार मीटर कॉपर वायर (अंदाजे १ लाख रुपये), लोखंडी कटर, आठ मोबाईल फोन, बजाज प्लॅटिना मोटारसायकल आणि मारुती स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ५,१५,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने जिल्ह्यातील इतर ठिकाणीही अशाच प्रकारच्या चोरी केल्याची कबुली दिल्याने त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.
या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२३/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. पुढील तपास पोहेकॉ. गोवर्धन बोऱसे करीत आहेत.










