जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील आव्हाणे येथील १२ वर्षीय बालक मंगळवारी बेपत्ता झाला होता. त्याबाबत पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली होती. दरम्यान, बुधवारी त्याचा मृतदेह दुपारी गिरणा नदी पात्रात तरंगताना आढळून आला. दरम्यान, त्याचा मृत्यू नदीत पाय घसरून पडल्याने झाला असावा, असा प्राथमिक कयास आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वैभव नरेंद्र पाटील (वय १२, रा. आव्हाणे ता. जळगाव) असे मृत झालेल्या बालकाचे नाव आहे. वैभव हा आई-वडील व लहान भाऊ यांच्यासह वास्तव्याला होता. तो सहावीच्या वर्गात शिकत होता. मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता घरातून निघाला होता. सायंकाळी उशीरापर्यंत वैभव घरी न आल्यामुळे नातेवाईकांनी वैभवचा शोध घेतला. गावात व शेतीशिवारात शोध घेतल्यावर देखील वैभव आढळून आला नाही. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. पोलीस ठाण्यात नोंद केल्यानंतर गावातील काही जणांनी मंगळवारी दुपारच्या वेळेस गिरणा काठावरील महादेव मंदिरात खेळताना पाहिले. याठिकाणी वैभवचे काका धीरज पाटील यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर खेळताना वैभव नदीवर गेला असावा या शंकेने बुधवार १८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता धीरज पाटील व स्वप्नील जोशी यांच्यासह काही जण नदी पात्रात शोध घेत असताना, २.३० वाजता गिरणेच्या वरच्या भागातील पात्रात वैभवचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या घटनेमुळे वैभवच्या मृत्यूने आईवडीलांना मोठा धक्काच बसला आणि मन हेलवणारा आक्रोश केला. तालुका पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केल्यानंतर, मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. माजी पोलीस पाटील उत्तम पाटील यांचा नातू होता.